▶️ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत
▶️मुंबई | 04 एप्रिल | जनशक्तीचा दबाव
▶️ गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण थोडे थोडके नव्हे, तर १० वर्षांहून अधिक काळ रखडले आहे. देशात इतका कालावधी कोणत्याच प्रकल्पांना लागला नव्हता, हा एकमेव प्रकल्प आहे, ज्याला सर्वाधिक काळ लागला आहे. याच्यामागे कारणेही तशी होती. मात्र, या डिसेंबरपर्यंत हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया रस्ते, परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान व्यक्त केली.
▶️जोपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाला जात नाही, तोपर्यंत सागरी महामार्गाच्या कामाचा विचारसुद्धा होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात करताना भूसंपादनासह अनेक अडचणी आल्या, त्याचबरोबर कोकणात डोंगर माथ्यावरून वाट करताना कालावधी गेला. त्यातच अनेक ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची वेळ आली.
▶️दरम्यान, या सगळ्या गोष्टी एका मागोमाग एक घडत गेल्याने या महार्गातील अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्पातील सर्वाधिक काळ लागलेला मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. आता बरेच अडथळे मार्गी लागले असून, या वर्षीच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लागेल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.