नेरळ - ग्रामपंचायत मधील रस्त्याच्या कडेला अनधिकृत बांधकाम केले जात आहे.त्या बांधकामाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करून तक्रारी करण्यात आल्या होत्या.दरम्यान, संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर नेरळ विकास प्राधिकरणकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचना नेरळ पोलिसांना केल्या होत्या.मात्र या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे काय?असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
शहरीकरणाकडे झुकलेल्या नेरळ,ममदापुर आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील भागाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नगररचना विभागाच्या आदेशाने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले आहे.नेरळ ग्रामपन्चायत मधील राज्यमार्ग आणि नगररचना विभागाने नियोजित केलेल्या रस्त्यांच्या कडेला नेरळ जकात नाका समोर दुकानाचे गाळे बांधले जात आहेत.त्या इमारतींबद्दल तेथील स्थानिकांनी नेरळ विकास प्राधिकरणकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नेरळ प्राधिकरणाचे शाखा अभियंता सचिन जगताप यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती.आणि त्यातून नेरळ विकास प्राधिकरण कडून नेरळ ग्रामपन्चायतला पत्र देऊन सदर बांधकाम रस्त्याच्या जागेत आहे असे नमूद केले होते.ते बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे आणि बांधकाम करणारे यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश नेरळ विकास प्राधिकरण कडून नेरळ ग्रामपंचायतीला दिले होते.मात्र तक्रारी होऊन आणि गुन्हे दाखल होऊन देखील संबंधित बांधकाम पाडले गेले नाही आणि जमीनदोस्त देखील करण्यात आले नाही.नेरळ येथील जकात नाका समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या लागून इमारत बांधण्यासाठी स्लॅब टाकण्याच्या कामासाठी पिलर उभे करण्यात आले आहेत.हे बांधकाम पूर्णपणे रस्त्याच्या जागेत आणि नेरळ विकास प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता केले आहे.
नेरळ विकास प्राधिकरणने सदर बांधकाम करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे सूचित केले आहे.पण गेल्या सहा महिन्यात नेरळ ग्रामपंचायत किंवा नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण यांनी कोणतीही कारवाई त्या रस्त्याच्या जागेत होत असलेल्या बांधकामावर केली नाही.त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे यांना बळ मिळत असून त्या ठिकाणी ताडपत्री बांधून बांधकाम सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायत कडून पाठिंबा आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नेरळ ग्रामपंचायत कडून ते अनधिकृत असलेले बांधकाम तोडण्याबद्दल कोणत्याही हालचाली केल्या नाहीत आणि प्रयत्न देखील केला नाही.त्यामुळे आता चक्क ताडपत्री लावून तेथे दुकानांचे गाळे बांधले जात आहेत.हे बांधकाम काही दिवसात पूर्ण देखील होईल असे स्थानिक रहिवाशी सांगत आहेत.