☸️तपास अधिकारी, सरकारी वकिलांना हायकोर्टाने धरले धारेवर
▶️मुंबई l 07 एप्रिल: मंत्रालय अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणप्रकरणी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात पुरावे सादर करणाऱ्या राज्य सरकारला सत्र न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. पुरावे सादर करण्यास विलंब का, असा संतप्त सवाल उपस्थित करत न्यायाधिश राहुल रोकडे यांनी राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देताना पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवली. तसेच बच्चू कडू यांच्यासह तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांना यावेळी हजर राहण्याचे आदेश दिले.
▶️२६ सप्टेंबर २०१८ रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करीत आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कडू यांनी मंत्रालयातील तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत बाचाबाची करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कडू यांच्याविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सध्या आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या वेळी बच्चू कडू हजर होते. मात्र तपास अधिकारी आणि सरकारी वकील वेळेत आले नाहीत. त्यामुळे न्यायालय संतप्त झाले. सुनावणी सुरु झाल्यानंतर न्यायालयाने पोलीस आणि सरकारी पक्षाला कथित मारहाणीसंबंधी सीडी तसेच इतर आवश्यक पुराव्यांबाबत विचारणा केली. त्यावर सरकारी पक्षाने संबंधित पुरावे सादर करण्यास असमर्थता दर्शवली.
▶️न्यायालयाने संताप व्यक्त करत घटनेला चार वर्षे उलटली असताना या प्रकरणात अद्याप पुरावे का सादर करू शकला नाहीत, अशी विचारणा करत पुढील सुनावणीवेळी संबंधित पुराव्यांसह हजर राहण्याचे निर्देश यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांना दिले.