नागपूर ,20 एप्रिल- अकोल्याच्या पाणीप्रश्नांसाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी काढलेली जलसंघर्ष यात्रा ही नागपूरच्या सीमेवर रोखण्यात आली. पोलिसांनी आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. देशमुख यांनी या यात्रेची परवानगी घेतली नसल्याने त्यांना रोखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
फडणवीसांनी पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याने आमदार नितीन देशमुख आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विरोधात १० एप्रिल रोजी अकोला ते नागपूर ही जलसंघर्ष यात्रा काढली होती. ही यात्रा, उद्या नागपूर येथे पोहचणार होती. ही स्थगिती उठवावी, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली. आज ते नागपूर सीमेवर शेकडो कार्यकर्त्यांसह पोहचले असता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी या यात्रेसाठी परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.