⏩छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ आणि हवेत गोळीबार
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ आणि हवेत गोळीबार
⏩रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारी करत असलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारी, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. हा तुफान राडा पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, शिवाय हवेत गोळीबार देखील करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
⏩रामनवमीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. बुधवारी रात्री साडे अकरा, बारा वाजण्याच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होतो. त्याच दरम्यान त्यांचा दुसऱ्या गटाशी वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ, हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी आपापल्या इतर साथीदारांना बोलावले आणि या वाद आणखी चिघळला. याबाबत पोलिसांना माहित मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला गेला.
⏩पण जमावाने यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान यावेळी जमावाने फक्त दगडफेक नाहीतर पोलिसांच्या काही गाड्या देखील जाळल्या. शेवटी पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही काही जमाव शांत झाला नाही, त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरू होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे.