▶️केंद्र सरकारने सर्व दुर्मीळ आजारांवर उपचारासाठी लागणारी आणि परदेशातून मागवली जाणारी खासगी औषधे, गोळ्या यांवरील सीमा शुल्क माफ केले आहे. दुर्मीळ आजारांवरील राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरील उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधावरील सीमा शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुर्मीळ आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे
▶️सरकारने विविध प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या पेम्ब्रोलिझुमाबलाही सीमा शुल्कातून सूट दिली आहे. औषधांवर साधारणपणे १० टक्के सीमा शुल्क आकारले जाते, तर जीवनरक्षक औषधांच्या काही श्रेणींवर ५ टक्के सीमा शुल्क आकारले जाते. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून दुर्मिळ कर्करोगाने पीडित मुलीच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयात औषधावर सीमाशुल्कातून सूट देण्याचे आवाहन केले होते. निहारिका नावाच्या या मुलीच्या उपचारासाठी ६५ लाख रुपयांच्या इंजेक्शनाची गरज होती. त्यावर सुमारे ७ लाख रुपये कर आकारला जात होता. मुलीचे पालक हा कर भरण्यास असमर्थ ठरल्याने त्यांनी थरुर यांना आपली समस्या सांगितली. आता सरकारने सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधांवरील आयात शुल्क रद्द करुन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या पावलामुळे निहारिकाच्या कर्करोगावरील उपचारासाठीचे इंजेक्शनही ७ लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.
▶️केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्याने काही दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे वैयक्तिकरित्या आयात केली तर त्याला सीमा शुल्क भरावे लागणार नाही. हा रोग दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध असायला हवा. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्र किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये हा आजार दुर्मिळ आजारांतर्गत येत असल्याचे प्रमाणित करावे लागेल. विशेष म्हणजे, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांना सीमाशुल्क सूट आधीच देण्यात आली आहे.