☸️भाजपा विजयाच्या संकल्प मेळाव्याला तुफान गर्दी; मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

Spread the love

⏩️रत्नागिरी ,15 एप्रिल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला आज तुफान गर्दी झाली. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याप्रसंगी शत प्रतिशत भाजपाचा नारा देत अनेक भाजपा वाढवण्यासाठी अनेक टीप्स दिल्या. मंत्री म्हणाले की, भाजपामध्ये कार्यकर्ताच नेता असतो. आपल्या खिशाला कमळ लावा. फ्रेंडस ऑफ बीजेपी वाढवा. केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वांना सांगा. आपला लोकसभा मतदारसंघ उजव्या विचारांचा असून यावेळी तो गड जिंकायचा आहे. केंद्रात आपले ४०० पार सदस्य निवडून येणार आहेत, त्याकरिता संकल्प करूया.

भाजपाचा विजय संकल्प मेळावा आज रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे-फडणवीस राज्य सरकारच्या योजनांचा मिळालेला लाभ आणि योजना आणि विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामपंचायतीमध्ये अभिनंदनाचे ठराव करा. सोशल मीडियाचा प्रभावी व योग्य वापर करा आणि आपल्या केंद्र, राज्यातील नेत्यांना फॉलो करा. मागील जि. प. निवडणुकीत आपल्याला एकही जागा मिळाली नाही. याचा बदला घ्यायचा आहे, असे भावनिक आवाहन भाजपा नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

⏩️रस्त्यांसाठी ५०० कोटींचा निधी
जिल्ह्याला रस्त्यांकरिता ५०० कोटींचा निधी दिला आहे. रोजगार देत आहोत. आपले जनसामान्यांचे सरकार आहे. जिल्ह्यात २ लाख ५२ हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याकरिता आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत. शत प्रतिशत भाजपा हे आपले उद्दिष्ट आहे. किसान सन्मान योजना, नमो योजना, रोजगार संधी यासह सबका साथ सबका विकास हा मंत्र अमलात आणूनच आपण विजय मिळवू शकतो. आपल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास हवा. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होत असताना आपले विरोधक सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. त्याला आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. फेसबुक, ट्विटर यांचा वापर करा. भाजप नेत्यांना फॉलो करा, रिट्विट करा, फॉरवर्ड करा, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

⏩️मंत्री चव्हाणांमुळे विजयाची नांदी
या वेळी अॅड. पटवर्धन म्हणाले की, विजय संकल्प मेळावा ही संकल्पनाच उर्जा देणारी आहे. १९८० मध्ये अटलजी व सहकाऱ्यांनी भाजपची स्थापना केली. त्यावेळी रत्नागिरीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते. परंतु गेल्या ४० वर्षांत भाजपाची ताकद वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढत भाजपाने १९१ सदस्य व १७ सरपंच विजयी झाले. मंत्री चव्हाण यांनी प्रतिकूल स्थितीतही सातत्याने विजय मिळवला, पराभव हा शब्द त्यांच्यापासून कोसो दूर आहे. त्यांचे मार्गदर्शन मिळणे ही विजयाची नांदी ठरणार आहे.

श्री. चव्हाण कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आल्याने प्रचंड गर्दी झाली. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंत्री चव्हाण यांचे स्वागत अॅड. पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. नंतर तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी भलामोठा पुष्पहार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान केला.

व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, अॅड. बाबा परुळेकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, राजेश सावंत, यशवंत वाकडे, अभिजित गुरव, प्रमोद अधटराव, महेंद्र मयेकर, मृणाल शेट्ये, ऐश्वर्या जठार, उल्का विश्वासराव, अनिकेत पटवर्धन, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष, मंडलप्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमोद जठार यांनी सांगितले की, २००६ मध्ये आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपाचा असेल, असा संकल्प केला होता व मंत्री चव्हाण यांच्या रूपाने तो सत्यात उतरला. आता रत्नागिरीमध्ये पुढील ५-१० वर्षांत भाजपाचा पालकमंत्री असेल असा संकल्प करूया. २०२४ च्या निवडणुकरूपी युद्धात जय मिळवण्यासाठी आपण सज्ज होऊया.

या वेळी रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूरमधून बूथ स्तरावरील कार्यकर्ते, बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सुरेख नियोजन केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page