☸️ दात का किडतात ?

Spread the love

परवा शाळेत जाणारी दोन मुले पाहिली. इतकी गोंडस की कोणीही त्यांना उचलून घ्यावे. मी हसल्यावर दोघेही हसले आणि मग मला त्यांचे किडके दात दिसले. तुम्हालाही हा अनुभव कदाचित तुमच्याच नातेवाईकांच्या मुलांबद्दल आला असेल. इतका सुंदर चेहरा, पण काय ते दात.. अरेरे!

मला अशा वेळी खूप वाईट वाटते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, दात किडण्याची मक्तेदारी फक्त मुलांवर सोपवून चालणार नाही. सर्वच वयोगटाच्या लोकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण भरपूर आहे. विश्वास बसत नसेल, तर आपल्या घरातील व्यक्तींचे आणि शेजाऱ्यांचे दात पाहा. दात का किडतात, त्याची आता माहिती घेऊ.

दाताला कीड लागली की, दात दुखायला लागतात. दातांना कीड लागते त्यात थोडा भाग आनुवंशिकतेचा, काही पाण्यामध्ये फ्लोराईड कमी असण्याचा आणि बराच भाग दातांची काळजी न घेण्याचा असतो.

दातांची निगा नीट न राखल्यास दातांच्या फटीं मध्ये अन्नकण, साखर इ. साठून सूक्ष्मजंतू वाढतात. त्यांच्या मुळे हळूहळू दातांचे टणक कवच ठिसूळ होते व झीज होऊन दाताला खड्डे पडतात. हे खड्डे दाताच्या आतल्या पोकळी पर्यंत खोलवर पोहोचले, तर पोकळी उघडी पडते. दाताच्या किडीवर उपचार म्हणजे दंतवैद्याचा सल्ला. कारण दाताची कीड कोणत्या अवस्थेत आहे, त्या अनुषंगाने तिच्यावर सुयोग्य उपचार फक्त दंतवैद्यच करू शकतो.

दात किडू नयेत यासाठी काही पथ्य पाळायला हवीत. साखर व साखरेचे पदार्थ (मिठाई वगैरे) कमी खावेत. चॉकलेट, कॅडबरी सारखे गोड आणि दाताला चिकटणारे पदार्थ खाऊ नयेत. जेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर, चुळा भराव्या. दिवसातून दोन वेळा (उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी) दात टूथपेस्ट आणि ब्रश किंवा कडूनिंबाच्या काडीने घासावे.

काही पालकांना वाटते की, लहान मुलांचे दुधाचे दात तर काय पडणारच आहेत. मग चॉकलेट खाऊन ते किडले तरी काय? पण सावधान.. कारण दुधाचे दात किडले, तर त्यांच्या खालून उगवणारे कायमचे दातही किडतात आणि हे दात पडले तर मात्र तोंडाचे बोळकेच होते. तेव्हा दात नीट सांभाळायला हवे, तरच आपण निरोगी राहू.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page