⏩ 28 एप्रिल/रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ३ अपक्ष उमेदवारांमुळे बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया टळली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे ३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. आज २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत यासाठी मतदान होणार आहे. उद्या २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अखेर सहकार पॅनेल स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पॅनेल स्थापनेबाबत सहकार्याची भूमिका घेऊन अखेरच्या क्षणी प्रस्ताव मान्य केला.
कृषी पतसंस्था बहुउद्देशीय सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अरविंद गोविंद आंब्रे, विजय वासुदेव टाकळे, मधुकर आंकर दळवी, नैनेश एकनाथ नारकर, रोहित दिलीप मयेकर, सुरेश भिकाजी सावंत, संदीप हनुमंत सुर्वे, अपक्ष संतोष रामचंद्र गोताड हे ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत सदस्य मतदारसंघातून सहकार पॅनेलचे ओमकार संजय कोलते यांचे नाव जाहीर झाले आहे. प्रशांत यशवंत शिंदे, अपक्ष उदय विमलनाथ कुते हे ३ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनेलच्या स्मिता अनिल दळवी, सौ. स्नेहल सचिन बाईत, अपक्ष बिल्कीस फारूख मुकादम हे ३ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सहकार पॅनलच्या उमेदवारांना कपबशी, अपक्ष उमेदवारांना नारळ, शिट्टी, कपाट या निशाण्या देण्यात आल्या आहेत. सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.