▶️ राजापूर (प्रतिनिधी):
एकमेकांशी होणाऱ्या संवादातुन चांगली चर्चा होते व प्रश्न सुटू शकतात. तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातुन उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून यातुन मार्ग काढावा हाच आपला प्रयत्न आहे. शेती, पर्यावरणाला हानी पोहचेल, प्रदूषण होईल याचे आंम्हीही कधी समर्थन करणार नाही. मात्र हा प्रकल्प आपल्या देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपल्या असलेल्या शंकांचे निरसन करून, उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करूनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी दिली.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्हयाचा जीडीपी 1.8 टक्क्यांनी तर देशाचा जीडीपी पाच ते दहा टक्यांनी वाढणार आहे. विकासाची नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने या प्रकल्पाबाबत चांगली चर्चा करून, आपल्या शंकाचे निरसन करून घेऊन सकारात्मक भूमिका घेताना देशहित डोळयासमोर ठेऊन या प्रकल्पाकडे पाहुया असे आवाहन करताना रोजगार, शिक्षण, आरोग्य याबरोबरच ज्यांची जमीन या प्रकल्पात जात नाही, मात्र ते प्रकल्पग्रस्त आहेत, त्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातुन लाभ कसा होईल यासाठीही आपण प्रयत्न् करू तसा अहवाल शानसाला देऊ असा विश्वासनही सिंग यांनी यावेळी उपस्थित स्थानिक भूमीपुत्रांना दिला.
तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक प्रकल्प ग्रस्त शेतकरी, प्रकल्प विरोधक, आणि प्रकल्प समर्थक यांची एक बैठक जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी गुरूवारी आयोजित केली होती. प्रकल्प विरोधकांच्या शंकांचे निरसन व्हावे, त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळावे, त्यांचे समाधान व्हावे यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत ही बैठक सिंग यांनी आयोजित केली होती. दिल्ली, मुंबई येथील एक तज्ञांची विशेष टीम यासाठी आणण्यात आली होती.
नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, एम. आय. डी. सी. चे सहाय्यक संचालक मलीकनेर, आयआयटीचे तज्ञ डॉ. तुहीन बॅनर्जी, दिल्लीच्या इंडीया लिमीटेडचे डॉ. प्रविण गोयल, डॉ. चिरंजीव पटनायक, ज्येष्ठ रिफायनरीचे तज्ञ व रत्नागिरीचे सुपुत्र प्रशांत गोगटे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाबाबत समर्थक व विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे स्वागत केले. या प्रकल्पाच्या माध्यमातुन होणारे लाभ आणि आर्थिक व सामाजिक विकासाबाबतही त्यांनी भाष्य केले. चुकीची माहिती, अफवांवर विश्वास ठेऊन नका, आपण चर्चेतुन मार्ग काढू, आपले समाधान होत नाही तोपर्यंत चर्चा करू, प्रकल्प ग्रस्तांनी गावात जरी बोलावले तरी आपण त्यांच्याशी चर्चा करू, प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही सिंग यांनी यावेळी दिली. मात्र यासाठी एकमेकांशी संवाद महत्वाचा असतो आणि त्यातुनच मार्ग निघतो असे सिंग यांनी सांगितले.
याप्रसंगी सिंधुदुर्ग येथुन आलेल्या प्रणाली राऊत व राजेंद्र फातरफेकर यांनी पर्यावरण व प्रदूषणावर आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. काही दाखले देत त्यांनी बैठकीच्या प्रारंभी प्रकल्प विरोधाची मते मांडण्याचा प्रयत्न् केला. मात्र त्याला प्रकल्प समर्थकांनी विरोध केला, अशा प्रकारे कायमच ही बाहेरची मंडळी येऊन तालुक्याचे वातावरण खराब करत असल्याचे नमुद करत यांना बोलण्याचा अधिकार नाही असे ठणकावले. तर चुकीच्या पध्दतीने भाष्य करू पहाणाऱ्या या दोघांनाही जिल्हापोलीस अधिक्षकांनी यांनी आपण प्रश्न विचार भाषणबाजी नको असे सुनावले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याचे उपस्थित तज्ञांनी उत्तर दिले.
मच्छीमार बांधवांच्या वतीने अमजद बोरकर, मलिक गडकरी, नदीम तमके, अन्वर धालवेलकर आदींनी आपले प्रश्न मांडले, यामध्ये मच्छीमारीवर परिणाम होईल का? किती नॉटीकलच्या बाहेर बंदी असेल, पाईपलाईन कशी जाणार यांसारखे अतिशय चांगले मुद्दे मांडले. यावर प्रशांत गोगटे यांनी विस्तृत विश्लेशन करून मार्गदर्शन केले. तर आपण उपस्थित केलेले प्रश्न शासनाकडे जो प्रकल्पाबाबत अहवाल पाठविला जाईल त्यात नमुद केले जातील व त्यावर योग्य प्रकारे निर्णय घेतला जाईल असेही एमआयडीसेचे उपसंचालक मलिकनेर यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक शेतकरी व प्रकल्प विरोधकांच्या वतीनेही काही चांगल्या सूचना व मुद्दे मांडण्यात आले. अविनाश नवाळे यांनी प्रकल्पाबाबत योग्य माहिती मिळाली पाहिजे, शंकांचे निरसन झाले पाहिजे असे नमुद करत जनसुनावणी घेण्याची मागणी केली. तर नंदकुमार मोहिते, विश्वनाथ कदम, रामचंद्र शेळके, रवींद्र शेळके, विष्णू इनामदार, विष्णू घाणेकर, श्री. वालम, चंद्रकांत गुरव, विजय गोसावी, संजय जाधव, दीलीप बोळे आदींनी आपले प्रश्न मांडले. यावर तुहीन बॅनर्जी, प्रविण गोयल, चिरंजीव पटनायक, प्रशांत गोगटे यांनी विस्तृत माहिती दिली. बारसू परिसरात पोलीस चेकपोष्टवर होत असलेल्या त्रासाबाबत बारसू धनगरवाडीतील ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. यावर अशा प्रकारे कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली. तर महिला आंदोलकांवर अन्याय झाल्याचा मुद्दा दिलीप बोळे यांनी उपस्थित केला असता अप्पर पोलि अधिक्षक गायकवाड यांनी तो खोडून काढत महिलांची योग्य प्रकारे काळजी घेतल्याचे सांगितले.
समर्थकांच्या वतीने देखील हनिफ मुसा काझी, अविनाश महाजन, विद्या राणे, विलास पेडणेकर, राजा काजवे, राजन लाड, सिध्देश मराठे, विनायक कदम, महादेव गोठणकर, रवीकांत रूमडे, नंदू चव्हाण, विनोद पवार, मनोज परांजपे, प्रेरणा खांबल आदींनी आपले प्रश्न मांडले व काही सूचना केल्या. त्याबाबतही तज्ञांकडून निरसन करण्यात आले.
तर जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत चांगली चर्चा झाल्याचे नमुद केले. यापुढेही आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवले जातील असे सांगितले. मात्र बाहेरच्या मंडळींनी येऊन वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करू नये असा ईशाराही त्यांनी दिला.
या बैठकीत काही वेळ विरोधक व समर्थकांमध्ये चमकही झाली. काही मंडळींकडून चुकीच्या पध्दतीने मांडल्या गेलेल्या मुद्यांवर समर्थकांनी आक्षेप घेतला. तर प्रशासनाकडून देखील अशा प्रकारे मुद्दे उपस्थित करणाऱ्यांना प्रश्न विचारा, शंकाचे निरसन करून घ्या असे सांगण्यात आले. या बैठकीत मोठया संख्येने उपस्थित असलेल्या प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. प्रकल्प विरोधकांकडून बाहेरून आलेल्या मंडळींनी काही मुद्दे उपस्थित केले. मात्र विरोधकांनी रोजगार निर्मितीसह आपल्या अन्य शंकाचे निरसन करून घेणे अपेक्षित असतानाही स्थानिकांकडून फारसे काही प्रश्न आले नाहीत.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही बैठक हाताळत प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी देत उपस्थित शंका व प्रश्नांचे तज्ञांद्वारे निरसन केले. अशा प्रकारे प्रशासनाकडून प्रकल्प विरोधकांसह समर्थनकांशी संवाद साधून हा प्रकल्प पुढे नेण्याबाबत करण्यात आलेल्या प्रयत्नांचे स्वागत होत आहे.
प्रारंभी जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाबाबत माहिती देणारी चित्रफित दाखवण्यात आली. तर आभार प्रांताधिकारी वैशाली माने यांनी मानले.
बारसू आणि नाणार अशी 60 एम. एम. टी. पी. ए. रिफायनरी उभारावी
याप्रसंगी बोलताना प्रकल्प समर्थक अविनाश महाजन यांनी बारसू येथे होत असलेली रिफायनरी कमी करून ती आता ही 20 एम. एम. टी.पी.ए. होणार आहे. त्यामुळे पुर्वीची प्रस्तावित 60 एम. एम. टी.पी.ए. रिफायनरी करावी व नाणार व बारसू मध्ये ती करावी अशी मागणी त्यांनी केली. नाणार परिसरातील शेतकऱ्यांनी साडेआठ हजार एकर जमिनीची संमती पत्रे शासनाकडे दिलेली असून ती जागा यासाठी घ्यावी पण पुर्वीची 60 एम. एम, टीपीचीच रिफायनरी करावी अशी मागणी महाजन यांनी यावेळी केली. तसे झाल्यास मोठी औद्योगिक क्रांती होईल असे त्यांनी नमुद केले. याबाबत शासनाकडे अहवाल पाठवू असे जिल्हाधिकारी सिंग यांनी सांगितले.