▶️ नवी मुंबई ,28 एप्रिल-
बदलापूर मध्ये महावितरणला एका दिवसात तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. यात पाणी पुरवठा योजनेसाठी चोरीच्या विजेचा वापर करणाऱ्या एका ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. याशिवाय बाटलीबंद पाणी तसेच जीन्स वॉशिंग कारखान्यावर कारवाई करून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वीजचोरी या पथकाने उघडकीस आणली.
महावितरणच्या कल्याण मंडळातील उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बदलापूर पश्चिमेतील काराव परिसरात तपासणी केली. यावेळी काराव ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी मीटर टाळून थेट आकडा टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. अधिक तपासणीत ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २७ लाख ४६ हजार रुपये किंमतीची १ लाख २४ हजार ८४० युनिट वीज चोरल्याचे स्पष्ट झाले. तर याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोरया ब्रेव्हरिज या बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या कारखान्याने आतापर्यंत सुमारे ८६ लाख २८ हजार रुपयांची ३ लाख ९२ हजार २०६ युनिट वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.