◼️ वाढत्या उकाड्यामुळे सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने वाढत्या उन्हामुळे सरकारी कार्यालयाच्या कामकाजांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. आता सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत. यामुळे विजेची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. मान सरकारच्या या निर्णयाचे सध्या कौतुक होत आहे.
◼️ महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज
गेली काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यातच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागासह मुंबईमध्ये 2 ते 6 मे या दरम्यानच्या काळात हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार यासह सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असे सांगण्यात आले आहे.
◼️ बियाणाची माहिती देण्यासाठी आता प्रत्येक गावात ग्रामसभा भरणार; कृषीमंत्र्यांचे आदेश
येत्या खरीप हंगामात पाण्याचा खंड व येणाऱ्या संकटाचा एकंदरीत विचार करुन नव्याने लागवड करण्यात येणाऱ्या पिकांची माहिती शेतकऱ्यांना ग्रामसभा घेऊन देण्यात यावी असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम नियोजन व पीएफएमई आदी विषयाची आढावा बैठक अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते.
◼️ आयपीएलच्या हंगामात आज रंगणार दोन सामने
आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. दरम्यान, सध्या प्ले ऑफच्या दृष्टीने सर्व संघांसाठी आताचे सामने महत्त्वाचे असतील.