☸️ बारसू प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्यासाठी शासनाची दडपशाही सुरू : खास.विनायक राऊत

Spread the love

▶️ राजापूर ,27 एप्रिल-

बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून प्रशासन हा विरोध मोडून काढत आहेत. तसेच ड्रिलिंगचं काम येथे सुरू केलं आहे. यावेळी पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांविरोधात शासनाची दडपशाही सुरु आहे. न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार असून त्याआधी बारसू येथे रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम सुरु आहे. जनतेला प्रशासनाकडून विविध प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असताना पोलिस अधीक्षक ही उत्तरे देत आहेत, असा संताप रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

बारसू येथील सुरु झालेल्या माती परीक्षणाच्या विरोधात गेले तीन दिवस सड्यावर प्रकल्प विरोधक ठाण मांडून बसले आहेत. त्यांची खासदार राऊत यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारसह पोलिसांवर जोरदार हल्ला चढविला.

तीन दिवस प्रकल्पाविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना आपली शेती महत्वाची वाटत आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर बळाचा वापर केला जात आहे. येथील जनतेला रिफायनरी प्रकल्प नको आहे. प्रकल्पाविरोधात भूमिपुत्रांचा लवकरच मोर्चा निघणार आहे. या मोर्चात ठाकरे गट ताकदीने उतरेल. आपण देखील यावेळी उपस्थित रहाणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार राऊत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी रोखून धरला होता. यावेळी काहीवेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, तालुका प्रमुख कमलाकर कदम, माजी संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे यांनीही आंदोलकांची भेट घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page