⏩ नवी दिल्ली , 28 एप्रिल-
सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत एका विशेष विमानाने 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या स्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.