
▶️ 27 एप्रिल ,बंगळुरु
-आयपीएलचा ३६ वा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगतदार सामना झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करून २० षटकात ५ विकेट्स गमावत २०० धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, या धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीची कोलकाताच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली.
फाप डु प्लेसिसनंतर शाहबाझ अहमद, ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतला आणि आरसीबीची धावसंख्या मंदावली. त्यानंतर विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी करून आरसीबीच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर व्येंकटेश अय्यरने विराटचा अप्रतिम झेल पकडला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. त्यामुळे आरसीबीने २० षटकात ८ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या आणि आरसीबीचा या सामन्यात पराभव झाला.