⏩मुंबई- गेल्या महिनाभरापासून राज्यातील तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी पावसाच्या सरी तर कधी कडाक्याच्या उन्हाच्या झळा बसत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी, अजूनही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे अवकाळीचं संकट पाठ कधी सोडणार? याची वाट बळीराजा पाहत असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, वादळी पाऊस हजेरी लावणार आहे. पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
हवामान खात्याने आज शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आधीच अवकाळीची धास्ती धरून बसलेल्या शेतकऱ्यांचं आणखीच टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भात तर सरासरीपेक्षा कमाल तापमानात चार ते नऊ अंशांनी घट झाली आहे. गुरुवारी (ता. २७) राज्यात सोलापूर येथे ३९ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान, तर यवतमाळ येथे १६.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस व गारांची स्थिती कायम आहे.
सोमवारपर्यंत (१ मेपर्यंत) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज कायम आहे. शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस अंशतः ढगाळ आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच सोमवारपर्यंत जिल्ह्याला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.