रत्नागिरी – बारसू – सोलगाव रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे नेते अशोक वालम यांना काल रात्री रत्नागिरीच्या शहर पोलिसांनी राजापूर येथून ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री त्यांना रत्नागिरी आणण्यात आले. उशिरापर्यंत त्यांच्यावरील अटकेची कारवाई करण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू होते. आतापर्यंत रिफायनरी विरोधी समिती तीन प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांची सुटका झाली आहे.
बारसू – सोलगाव रिफायनरीसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. पंचकोशीतील स्थानिक ग्रामस्थानी रिफायनरीला तीव्र विरोध करत भू सर्वेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी 110 ग्रामस्थांना अटक केली होती. सध्या त्यांची न्यायालयाने जमिनीवर सुटका केली आहे.
रिफायनरी विरोधी गटातील नेत्यांना पोलिसांनी लक्ष केले आहे. सर्वेक्षणाला होणारा विरोध मोडीत करण्यासाठी पोलिसांनी आता नेत्यांची धरपकड सुरू केली असून गुरुवारी रात्री अशोक वालम यांना रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने राजापूर येथून ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. परंतु आज अशोक वालम यांना कोणत्या न्यायालयात हजर करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.