☯️नागपुरातील कामठी कँटोनमेंट बोर्डाच्या तीन जणांना लाखो रुपयांची लाच घेताना सीबीआयने पकडले रंगेहाथ

Spread the love

▶️नागपूर: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर जिल्ह्यातील कामठी कँटोनमेंट बोर्डातील नोकर भरती प्रकरणी सफाई कर्मचाऱ्यासह तिघांना दोन लाखांची लाच घेताना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सफाई कर्मचारी दीप रमेश सकतेल, माळी या पदासाठी निवडलेले उमेदवार चंद्रशेखर कुवरलाल चिधलोरे आणि कामठी कँटोनमेंट बोर्ड, शाळेतील नर्सरी शिक्षिका शीतल रामटेके यांचा समावेश आहे. यांना २१ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रमेश सकतेलसह कामठी कँटोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कृष्णाजी लांजेवार यांच्यासह केसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याचेही नाव होते. यातील माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार या सगळ्यांना सोबत घेऊन नोकर भरतीसंबंधीचे रॅकेट चालवित असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. हे सर्वजण मोठ्या लाचेच्या बदल्यात सहाय्यक शिक्षक, माळी व सफाई कर्मचारी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांशी संपर्क साधत होते. व त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन देत होते. सहाय्यक शिक्षक पदासाठी कामठी कँटोनमेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव असलेल्या पात्र उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी केसीबीचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार नियमितपणे सफाई कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

एका प्रकरणात माळी पदासाठी निवड झालेल्या एका उमेदवाराशी सफाई कर्मचारी दीप रमेश सकतेल याने संपर्क साधीत त्याला निवडीचे आश्वासन दिले. केसीबीमध्ये माळी या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला सुरुवातीला ५० हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर उर्वरित पेमेंटबाबत चर्चा केली आणि ११.५० लाख रुपये देण्याचे मान्य केले. सीबीआयने सापळा रचून सफाई कर्मचाऱ्याला एकूण लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान, केसीबी स्कूल, नागपूरमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणारी नर्सरी शिक्षिका शीतल रामटेके हीचीही भूमिका उघडकीस आल्याने तिलाही पकडण्यात आले. आरोपी आणि इतरांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली. त्यात कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना २१पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page