
☯️महाराष्ट्र भूषण कार्यकर्मात घडलेली घटना दुर्दैवीच; मात्र अशा घटनेचं राजकारण करू नये : पालकमंत्री उदय सामंत
नवी मुंबई- नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक एकत्र आले होते. मात्र कार्यक्रमात उष्माघातामुळे 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच रुग्णालयात श्रीच्या सेवेकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
आता शिंदे सरकारकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कार्यकर्मात घडलेली घटना दुर्दैवीच आहे. मात्र अशा घटनेचं राजकारण करू नये, उलट विरोधकांनी अशावेळी एकत्र यायला हवं. कार्यक्रमासाठी मदतीनीस ६०० होते, नर्स १५० होत्या, रुग्णवाहिका ७३ होत्या. अमराईमध्ये ४ हजार बेडचं हॉस्पिटल सज्ज होतं. इतर हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्यात आले होते. तसेच १ हजार ५० बसेस होत्या. जास्तीत जास्त सुविधा श्री सदस्यांना देण्यात आलेल्या होत्या.
दरम्यान मागील दोन दिवसात अचानक वातावरण बदललं. त्यामुळे तापमान ३४ ते ३५ पर्यंत पोहोचलं. अनेक लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आदल्या दिवशीच आलेली होती. श्रीसेवक ज्या श्रद्धेने आली होती, त्यांना थांबवण कठीण होतं, असंही सामंत म्हणाले. कार्यक्रमाला २० ते २२ लाख लोक सामील झाले होते. प्रशासनाने हुकूमशाही करून कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला नव्हता. मात्र याच्यातही राजकारण केलं जातं, हे दुर्दैवी आहे. या घटनेचं समर्थन करता येणार नाही. पण यावर सांघिकपणे सर्वांना दिलासा देणं आवश्यक होतं, असंही सामंत यांनी नमूद केलं.