☯️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान होणार
⏩नवीमुंबई- महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा आज रविवारी पार पडणार आहे.
या महासोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले आहेत. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापना, आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला. मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2014 साली त्यांना डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली. 2017 मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले.
या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतूक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत.