⏩रत्नागिरी (प्रतिनिधी) : लोकांना पाणी काटकसरीने वापरा असे आवाहन नगरपरिषद करीत आहे त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून -शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी रत्नागिरी नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीटंचाई जाणवत असताना प्रशासनाच्या बेफिकीर कारभारचा पर्दाफाश झाला आहे. यातून दिव्याखालील अंधार अधोरेखित झाला आहे.
रत्नागिरी शहरातील पोलीस अधीक्षक बंगल्याशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीतून ही गळती होत आहे. २ लाख लिटर इतकी या टाकीची क्षमता आहे. पण गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे स्थानिकांकडून या बाबत नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील पाण्याचा साठी कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे फर्मान नगर परिषद प्रशासनाकडून काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. एकीकडे पाणीपुरवठ्यात कपात करायची
दुसरीकडे पाणी वाया जाऊ नये यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न करायचे नाही, असा अजब कारभार सुरू असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.