चिपळूण: चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार अशोक काजरोळकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर या तक्रारीच्या चौकशीअंती चिपळूण तहसीलदार यांनी हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिले आहेत.
सावर्डे नाभिकवाडी येथील सुनील जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत वावे येथील कापशी पुलाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. जाधव यांनी येथील जमिनीचे राष्ट्रीय महामार्गाकडून भूसंपादनाचे पैसे घेतले व येथे इमारत काढून टाकली आणि संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले, अशी तक्रार सावर्डे येथील अशोक काजरोळकर यांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत भूमी अभिलेखकडून मोजणी करण्यात आली. मोजणीमध्ये सदरचे बांधकाम हे पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जागेत असल्याचे निष्पन्न झाले; मात्र यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी ही जागा आपल्या अखत्यारित नसल्याचे तक्रादार व तहसील चिपळूण कार्यालयाला कळवले होते; परंतु तहसीलदारांनी ही जागा ही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडेच असल्याची खात्री करून सदरचे बांधकाम काढून टाकण्याची कारवाई करण्याकरिता राष्ट्रीय महामार्गाला पत्र दिले असून कारवाईचा तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.