☯️रत्नागिरी शहरात झळकले बॅनर्स, झेंडे; स्वागताची जंगी तयारी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
रत्नागिरी- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभर बाकी असतानाच भाजपाने विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांना बळ देतानाच भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी मतदारसंघांमध्ये विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी देण्यात येत आहे. सध्या भाजपाचा एकही आमदार, खासदार नसल्याने या जागा पुन्हा मिळवण्याकरिता रणनिती आखण्यास सुरवात केली असून त्याकरिता भाजपाचे नेते, सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ता. १५ एप्रिल २०२३ रोजी रत्नागिरीत येत आहेत. मंत्री चव्हाण यांच्या स्वागताचे फलक शहरभर झळकले असून भाजपाचे झेंडेसुद्धा लावले आहेत.
श्री. चव्हाण यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे रत्नागिरी तालुक्यासह राजापूर, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. चारही तालुक्यात भाजपाची ताकद आहे, ही ताकद आणखी वाढण्याकरिता खास नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला जात असून यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. पूर्वी विकासकामांकरिता निधी मिळत नव्हता, आता या मोठ्या प्रमाणात विकास निधी वितरित करून कामे करून मतदारांना आकृष्ट करण्याची योजना बनवण्यात आली आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे शनिवारी सकाळी १०.२० वाजता रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आगमन होईल व १०.४५ वाजता माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे भाजपा दक्षिण रत्नागिरी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यास येतील. या मेळाव्यास सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले असून सुमारे पाचशे जण उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व शहराध्यक्ष आणि सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, भाजयुमो शहर पदाधिकारी, महिला पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
श्री. चव्हाण दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथून चिपळूणला रवाना होणार आहे. ४ वाजता चिपळूण येथे भाजपा उत्तर रत्नागिरीतर्फे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ६.३० वाजता गुहागरला रवाना होणार आहेत. तेथे ७.३० वाजता गुहागर तालुका पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रात्री ते चिपळूणला येऊन तिथून मुंबईला रवाना होणार आहेत.