⏩हैदराबाद- आयपीएलचा यंदाचा हंगाम जसजसा पुढे जातोय तशी संघामधली स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या मुंबई विरुद्ध हैदराबादच्या सामन्यात मुंबईला मिळालेल्या विजयामुळे आता पाच संघ सहा गुणांवर असून प्रत्येकी तीन सामने त्यांनी जिंकले आहेत. पण याला अपवाद ठरलेला आहे तो राजस्थान रॉयल्सचा संघ ज्याने आतापर्यंत चार सामने जिंकलेले असून आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.
बुधवारी बलाढ्य राजस्थानचा सामना चांगल्या फॉर्मात असलेल्या लखनऊशी होणार आहे. दोन्ही संघानी आपला मागील सामना जिंकला आहे. तडाखेबंद असे खेळाडू दोन्ही संघात आहेत.
⏩आपल्या घरच्या मैदानावर खेळणार राजस्थान
राजस्थान विरूद्ध लखनऊचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम होणार आहे. तीन वर्षांनंतर राजस्थान आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. राजस्थानचा संघ सुरेख कामगिरी करत असून जॉस बटलर, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल तुफान फलंदाजी करत आहेत, तर गेल्या दोन सामन्यात शिमरन हेटमायर ही आपल्या फलंदाजीच्या मूळ रंगात आलेला असून गोलंदाजांची धुलाई करत आहे. तसेच गोलंदाजीत आश्विन, चहल हे दोघे आपल्या फिरकीवर फलंदाजांना सळो की पळो करून सोडतात. लखनऊने देखील दमदार कामगिरी करून दाखवलेली आहे. कर्णधार राहुलला लय सापडली असून कायल मेअर्स, निकोलस पूरन यांचाही लखनऊच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.
दरम्यान जयपूरची खेळपट्टी गोलंदाजासाठी पोषक असते. पहिली फलंदाजी करताना १५८ ही सरासरी धावसंख्या आहे. जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम हा राजस्थानचा गड राहिलेला आहे. तिथे राजस्थानला हरवणे कठीण आहे. त्यामुळे सामना कोण जिंकेल हे बघणे औत्सुक्याच ठरेल.