☯️काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा दावा
⏩मुंबई ,24 एप्रिल
खारघरमधील महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारची कोंडी केली असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. खारघरमध्ये त्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना पहिला मृत्यू दुपारी १२ वाजता झाला होता, तरीही हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला, असा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
खारघर प्रकरणात राज्यातील सरकार फारसं गांभीर्यानं पाहत नाही. या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप पटोले यांनी यावेळी केला. सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावं यासाठी महाराष्ट्र काँग्रेसनं आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे फडणवीस सरकारवर आरोप करत खारघरमधील घटना जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
या सरकारला जनाची नाही, मनाची तरी लाज असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पण सरकारनं एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली आहे, हा केवळ धूळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिंमत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी आग्रही मागणी पटोले यांनी यावेळी केली.