
⏩13 एप्रिल 2023/ रत्नागिरी – गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मातरण याबाबतचे कायदे त्वरीत व्हावेत यासाठी रत्नागिरीत हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी दि. १५ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता मोर्चा श्री शिवतीर्थ मारूतीमंदिर येथून सुरू होईल. या मोर्चाला योगीताताई साळवी, धनंजय देसाई, विनय पानवळकर मार्गदर्शन करणार आहेत. मोर्चा मारूतीमंदिर, माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका तेथून स्वा. लक्ष्मी चौक, गाडीतळ येथे समारोप होणार आहे. या हिंदू गर्जना मोर्चाला सर्व हिंदू बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. या वेळी संतोष पावरी, राकेश नलावडे, केशव भट, संजय जोशी आणि चंद्रकांत राऊळ उपस्थित होते. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांनी उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या लेकी सुना कधी नव्हे एवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. कोणती हिंदू मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल याची शाश्वती उरलेली नाही, असे या वेळी सांगण्यात आले.
मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी भगिनी श्रद्धा वालकर आमच्या डोळ्यादेखत लव्ह जिहादला बळी पडली आणि तिचे 35 तुकडे करून फेकण्यात आले. तरीही आम्ही शांत बसलो. आमची ही शांतता म्हणजे आमची मूकसंमती असे जगाने गृहीत धरले. आमच्या डोळ्यासमोर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बिनदिक्कत अवैध प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यातून पहाटेपासून रात्रीपर्यंत, कानाचे पडदे फाटेपर्यंत आवाज दिला जात आहे. तरीही आम्ही शांतच आहोत. आम्ही शांत म्हणून प्रशासनही शांतच आहे.
आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची गरज आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच चाललेली आहे. एनआरसी सारखा कायदा होणे गरजेचे आहे. पाकिस्तान व बांगलादेशांत हिंदूवर अत्याचार होत आहेत. जगातील हिंदूची जबाबदारी आता आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. देशात समान नागरी कायदा आणण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच आता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, रत्नागिरीच्या सकल हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. किमान दहा हजारांहून अधिक हिंदू रस्त्यावर उतरतील, असे सांगण्यात आले.