
⏩13 एप्रिल 2023/मंडणगड- येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते महात्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक आदेश मर्चंडे लाभले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. शामराव वाघमारे, प्रा. शरीफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. धनपाल कांबळे, डॉ. मुकेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी आदेश मर्चंडे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले हे एक थोर विचारवंत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वंचितांसाठी वाहिले. दीन-दलित आणि उपेक्षित समाजासाठीचे त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. सामाजिक, शैक्षणिक व साहित्य अशा अनेक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. विशेष करून स्त्री शिक्षणातील कार्य त्यांचे उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांचे योगदान देखील महत्वाचे राहिले आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.