रत्नागिरी : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून (सन १९७८) ते आजपर्यंत जवळपास ४५ वर्षे एकमेकाला साथ देणाऱ्या निवृत्त प्राध्यापक उदय बोडस व त्यांची धर्मपत्नी सौ. साधना बोडस यांनी आपली वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याची साठीशांत आगळ्या प्रकारे साजरी केली आहे. दोघांच्या वयात अवघे २ दिवसांचे अंतर आहे. उदय बोडस सरांचा जन्म २० एप्रिल १९६३ चा तर सौ. साधना (जोशी) बोडस याचा जन्म २२ एप्रिल १९६३ चा. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन स्वकष्टाने दोघांनी जीवनातला आजचा पल्ला गाठला आहे. आता दोघांचा वयाचा हिरकमहोत्सव पूर्ण होतो आहे. त्या निमित्ताने त्यांनी आगळा पायंडा पाडला आहे.
वर्गमित्रच असल्याने दोघांचाही मित्रपरिवार मोठा आहे, तसेच सामाजिक कामामुळे जनसंपर्क सुद्धा भरपूर आहे, तरीही दोघांनी आपला हिरक महोत्सवी वाढदिवस आगळ्या प्रकारे साजरा करायचा ठरवला आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरवला. केक, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट टुगेदर, हॉटेलिंग, नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता आपल्या वयाच्या पूर्ण झालेल्या वर्षा इतकी रक्कम रुपये ६०,००० ही सामाजिक कार्यासाठी खर्च दोघांनी करायचे ठरवले आणि ती रक्कम दान केली.
गेली १० वर्षे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ व्यक्ती व ८ सामाजिक/ शैक्षणिक संस्था यांना पुरस्कार आणि देणग्या या मार्गाने रुपये ४ लाख ८६ हजार इतकी रक्कम वितरीत केली आहे, यावेळी हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग, मतीमंद, निराधार मुले, महिला आणि वृद्ध यांच्यासाठी काम करणाऱ्या ७ सामाजिक व स्वयंसेवी संस्थाना मिळून रुपये ६०,००० देणगी रूपाने देण्याचे दोघांनी ठरवले. त्यासाठी सदर संस्थांची निवड त्यांनी स्वत: केली. मार्च महिन्यात खात्याची माहिती मागवली .
स्नेहदीप संस्थेचे इंदिराबाई बडे कर्णबधीर विद्यालय दापोली, ग्रामआधार स्वयंसेवी संस्था संचालित जीवन ज्योती विशेष शाळा व मतीमंद पुनर्वसन केंद्र शृंगारतळी – गुहागर , सांदिपनी गुरुकुल कुडवली- ताम्हाने संगमेश्वर, जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे अभ्यंकर निरीक्षणगृह- बालगृह ( जुने रिमांड होम ) रत्नागिरी , कै. श्रीमती जानकीबाई (अक्का) तेंडूलकर महिलाश्रम लांजा, स्वस्तिक फौंडेशन संचालित दिवीचा वृद्धाश्रम असलदे कणकवली आणि जीवन आनंद संस्था संचालित संविता वृद्धाश्रम पणदूर कुडाळ या ७ संस्थाना मिळून रुपये ६०,००० ची रक्कम देणगी रूपाने, दोघांनी आपल्या बँक खात्यातून ५ एप्रिल ते १२ एप्रिल या दरम्याने पाठवून आपला संकल्प पूर्ण केला आहे.
कोणतीही पूर्व कल्पना न देता थेट देणगी देऊन दोघांनी सबंधित संस्थाना सुखद धक्का दिला आहे. दोघांनी हा आगळा वेगळा हिरकमहोत्सव अशा प्रकारे साजरा करून नवा पायंडा पडल्याबद्दल संबंधित संस्थानी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.