☯️महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ
🌎 रत्नागिरी न्यूज नेटवर्क
⏩18 एप्रिल2023,रत्नागिरी-
भारतरत्न महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांचे समाजावर मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळे महिलांचे शिक्षण सुरू झाले. त्यांना शंभराव्या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळाला. त्याची जाणीव आपण ठेवली तरच आपले पाऊल समाजाच्या उन्नतीसाठी पडेल. तुम्हाला दिलेली जबाबदारी पार पाडलीत तर करिअरचे सोने होईल. ज्ञानाचा अहंकार असता कामा नये. यश तुमचेच आहे. उंचावर जगाने तुम्हाला पहावे म्हणून जावू नका तर तुम्हाला जग पाहायचे आहे, याकरीता जा, कलाकौशल्य, सर्जनशीलता, आत्मविश्वास, निर्णय घेण्याची ताकद पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजमध्ये पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विलास पाटणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर उपस्थित होत्या. या वेळी ॲड. पाटणे यांनी नील आर्मस्ट्रॉंग, श्रीकृष्ण -अर्जुन, ई श्रीधरन, शेषन आणि उन्नीकृष्णन यांच्या गोष्टी सांगत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिक्षण वेगाने बदलत आहे. अमेरिकेतील रोबोट वकिलाविरोधातील प्रकरण न्यायालयात गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रोबो हा खटला चालवणार आहे. असेही ॲड. पाटणे यांनी सांगितले.
याप्रसंगी मंदार अध्यक्ष सावंतदेसाई म्हणाले की, शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी महर्षी आणि बाया कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. ४५ हजार विद्यार्थिनींचे आपले मोठे कुटुंब आहे. विद्यार्थिनी जगात कुठेही गेल्या व महर्षी कर्वे संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत, असे सांगितले तरी आपला उच्च दर्जा आणि संस्कार लगेच सर्वांना कळतात. काही विद्यार्थिनींना कॉलेज फी, हॉस्टेल फी देता येत नाही त्यांच्यासाठी भाऊबीज निधी उभा करून विद्यार्थिनींना मदत केली जाते. तुम्ही जे येथे शिकलात, ते तुम्ही जेथे जेथे जाल तेथे हा समर्थ वारसा अजून जोमाने चालवा.
प्रभारी प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांनी बीसीएच्या २१ व्या बॅचचा पदवीदान समारंभ असल्याचे सांगितले. ६० पैकी ३० विद्यार्थिनींना विशेष श्रेणी मिळाली व १४ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी मिळाल्याचे सांगितले. यातील विद्यार्थिनींना आज पदवीदान करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, प्रकल्प समिती सदस्य शिल्पा पानवलकर, ॲड. श्रीरंग भावे, प्रसन्न दामले यांच्यासह उद्योजक प्रवीण लाड आदींसह आजी-माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. निमिषा शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. केतन पाथरे यांनी आभार मानले.