⏩24 एप्रिल/रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) प्रस्तावानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांतील ८ समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे, गुहागर या दोन किनाऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर, रायगडमधील दिवेआगार, वर्सेली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत.
या सागर किनारपट्टीचा पर्यटनात्मक व्यावसायिक वापर करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पर्यटन योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी एमटीडीसीने केली होती. ही योजना राबवताना पर्यावरणाला पूरक सुविधा आणि योजनांचा वापर करण्यात यावा, असे प्रस्तावित करण्यात आले होते तसेच या सुविधांबरोबर रोजगारांच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार होती. त्यानुसार कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. स्थानिक व्यक्तींना यात ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाणार असल्याचे पर्यटन विकास मंडळाकडून सांगण्यात आले.
बीच शॅक्स 15 बाय 12 फूट उंचीची असेल. यात बसण्यासाठी 15 ते 20 फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायं. ७ वाजेपर्यंत या शॅक्स सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आणि पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागांवर या कुट्या उभारण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीसाठी लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा निधी ना परतावा तत्त्वावर घेण्यात येणार आहे.