
⏩धुळे- मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडणाऱ्यांसमोर धुळ्यातील पाटील दाम्पत्याने कन्यारत्नाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत आदर्श निर्माण करून दिला. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदात पाटील दाम्पत्याने चक्क गावातील घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या संपूर्ण गावातील ग्रामस्थांचे २० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणाच केली. या अनोख्या पद्धतीने कन्यारत्न जन्माचे स्वागत केल्याने संपूर्ण धुळे जिल्हातून सरपंच नंदिनी पाटील दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
एकीकडे मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक कुटुंबीयांमध्ये काहीशी नाराजी बघावयास मिळत असते. परंतु धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दबाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदिनी पाटील यांना दुसऱ्यांदा देखील कन्यारत्न जन्माला आले. यानंतर तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. नुसते स्वागताच नाही, तर या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर देखील तिच्या जन्माचा आनंद संपूर्ण गावासोबत या दाम्पत्याने मोठ्या थाटामाटात साजरा केला.
सरपंच असलेल्या नंदिनी पाटील दाम्पत्यास यापूर्वी देखील चार वर्षांची मुलगी आहे. दुसरे दाम्पत्य देखील मुलगीच जन्माला आल्यानंतर मुलाच्या जन्माप्रमाणेच या दाम्पत्याने मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला आहे. या मुलीच्या जन्मोत्सवात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे गावात कीर्तन व भोजनाचा कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची यापूर्वीच तारीख व्यस्त असल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम करणे शक्य होत नसल्यामुळे कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या महिला सरपंच नंदिनी पाटील दाम्पत्याने चक्क मुलीच्या जन्माच्या निमित्ताने गावातील पाणीपट्टी व घरपट्टी भरणाऱ्या करधारकांचा २० टक्के कर भरण्याचा निर्णय घेतला आहे.