⏩मुंबई- जी भीती होती, तीच आता खरी ठरताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हातपाय पसरणारा कोरोना डोके वर काढू लागला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार १५२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने गेल्या २४ तासांतील कोरोना अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, आज शुक्रवारी (१४ एप्रिल २०२३) ११५२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ८१,५४,५२९ झाली आहे. महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणारा कोरोना अहवाल समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या वर नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत ११५२ नवे रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या कोरोना बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत 920 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. याच बरोबर, 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 80 लाख 126 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के एवढा आहे. या घडीला सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे 1643 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1056 सक्रिय रुग्ण आहेत.