
️ चित्रपटाबद्दलचा वाद थांबेना, काँग्रेस नेते शशी थरूर यांचं खुलं आव्हान
केरळ- शशी थरूर, द केरळ स्टोरी निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. जिथे केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही ही आमची केरळ स्टोरी नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता थरूर यांनी चित्रपटाबाबत आणखी एक ट्वीट केलं आहे.
“ही तुमच्या…”, काँग्रेस नेते शशी थरूर यांची वादात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की केरळमधील ३२,००० हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना बळजबरीने धर्मांतरित करून ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले. या चित्रपटाच्या कथेवरून वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेससह इतर पक्ष या चित्रपटाला विरोध करत असून हा अजेंडा असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही याबाबत ट्वीट केले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “केरळमधील ३२,००० महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि काही पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की त्यांत्याकडे कोणतेही पुरावे नाहीत कारण मुळात कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत?.” याबरोबरच थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘केरळमधील ३२००० महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये न्या’ असं लिहिलं आहे. ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.