
▶️मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पक्षाचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. यासाठी कार्यकर्ते आंदोलनाला देखील बसले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान करत महत्वाची माहिती दिली आहे.
शरद पवार हे आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार आहेत, मात्र त्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केल्याचा निरोप अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी जर आंदोलन सुरूच ठेवलं तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असंही शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असंही शरद पवारांनी सांगितलं असल्याची माहिती अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. अजित पवार यांनी मुंबईत आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असंही अजित पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
शरद पवार म्हणाले, “१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.
सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं.