▶️ मुंबई- काल मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा ६३ वा वाढदिवस झाला. बघता-बघता महाराष्ट्र राज्य ६३ वर्षांचे झाले. साठीनंतर व्यक्तीला अधिक समंजस्यपणा यावा, असे मानले जाते. साठीनंतरचा काळ ‘काटे नसलेल्या गुलाबा’सारखा असतो, असे मानले जाते. आजची राज्याची परिस्थिती समंजसही नाही. आणि काटे नसलेल्या गुलाबाची तर अजिबातच नाही. या ६० वर्षांच्या आगोदरचा म्हणजे १९५५ ते १९६० हा पाच वर्षांचा महाराष्ट्राचा काळ. देशाच्या कुठल्याही राज्यात लोकशाहीचा इतका प्रचंड शांततापूर्ण मार्गाचा लढा झालेला नाही. ब्रिटीशांच्या काळातील ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ सोडले तर या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या सत्याग्रहींवर गोळ्या चालवून १०५ माणसांचे बळी घेतले गेले. शेकडो माणसे अपंग झाली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. पण या लढ्याने महाराष्ट्राची एकजूट साऱ्या देशाने पाहिली. असा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि चळवळ घराघरात पोहोचवली ती शाहीरांनी. दोनच दिवसांपूर्वी म्हणजे २५ एप्रिलला शरद पवार साहेबांच्या हस्ते ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राजा बढे यांच्या अमर गिताचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले. त्यावेळच्या भाषणात शरद पवारसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ शाहीरांनी घराघरात पोहोचवल्याची माहिती दिली. त्यात शाहीर साबळे यांचाही उल्लेख केला. ‘महाराष्ट्र गीत’ शाहीर साबळे यांच्यामुळेच घराघरात पोहोचले, अमर झाले… तोंडपाठ झाले. शाहीर साबळे यांच्यावर आता चित्रपट येत आहे… त्याचेही स्वागत. आता तर राज्य सरकारने ते ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सन्माननीय राज्यगीतही केले. त्यातील दोनच कडवी उचलली… आणि त्यातील एकच ओळ शरद पवार साहेबांच्या मनात घर करून बसली….
‘भीमथडीच्या तट्टांना या यमूनेचे पाणी पाजा….’ यातील भीमथडी म्हणजे भीमा नदीच्या काठावरचे बारामती गाव. अनेकांना हा तपशील माहिती नव्हता. याच कार्यक्रमात पवारसाहेबांनी शाहीरांचे कौतुक केले. पण, पवारसाहेबांना हे सांगणे आहे.. ज्या शाहिरांनी सगळी ताकद पणाला लावून पाच वर्षे महाराष्ट्रात हा जागर केला… त्यांचे महाराष्ट्राने काय कौतुक केले….? आणखी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे…. शाहीर साबळे हे मोठेच शाहीर होते… संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सारा महाराष्ट्र घुसळून काढण्याचे काम ज्या शाहीरांनी केले… त्यात शाहीर साबळे नव्हते. प्रामुख्याने अमर शेख यांचेच कलापथक आणि अण्णाभाऊ साठे हेच प्रमुख होते. त्याचे एक राजकीय कारण होते… कारण मुंबईची चळवळ कम्युनिष्ठांच्या हातात होती. तरीही ही सगळी चळवळ ज्या शाहीरांनी आपल्या खांद्यावर घेतली त्याचे महामेरू लोकशाहीर अमर शेख, महान कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे. आत्माराम पाटील… शाहीर गव्हाणकर… शाहीर जंगम… शाहीर गजाभाऊ बेणी… शाहीर जैनु शेख… आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या केशरताई जगताप… (नुकतेच केशरताईंचे निधन झाले. ) या कलापथकाने कसलीही अपेक्षा न करता… अख्खा महाराष्ट्र घुसळून काढला आहे. महाराष्ट्राचा इितहास समजून घ्यायचा असेल तर संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी जो वणवा पेटला होता त्याची सगळी मानसिक तयारी शाहीर मंडळींच्या आग ओकणाऱ्या पोवाड्यांनी केली होती. आज ते दिवस समोर येतात.. त्या सभा… ते मोर्चे… त्या लढाया… त्या घोषणा… ते आचार्य अत्रे… कॉम्रेड डांगे… एस. एम. जोशी… सेनापती बापट… प्रबोधनकार ठाकरे… दादासाहेब गायकवाड… क्रांतिसिंह नाना पाटील… उद्धवराव पाटील…. दाजीबा देसाई… बापू लाड… भगवानराव सूर्यवंशी… नाशिकचे विठ्ठलराव हांडे… बी. सी. कांबळे… दादासाहेब रूपवते… एक नाही अनेक नेते (खूप नावे पाठ आहेत… पण त्यासाठी एक पान लागेल…) आणि तोलामोलाचे अनेक कार्यकर्ते ज्यांनी संयुक्त महारष्ट्र या एकाच ध्येयाकरिता पाच वर्षे आपला संघर्ष जागता ठेवला. त्या पाच वर्षांत कोणी कोणाची जात पाहिली नाही… धर्म पाहिला नाही… निवडणूकीत पैशाला कसलीही िकंमत नव्हती… फक्त एकच लक्ष्य…. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…. ’ एकच गर्जना… त्यामुळेच सारा महाराष्ट्र पेटून उठला. मुंबईचे बी. सी. कांबळे अत्यंत अभ्यासू, विद्वान नेता… त्यांना लोकसभेसाठी अहमदनगर जिल्ह्यातून उभे केले. त्यांनी काँग्रेसचे आठरे-पाटील यांना पराभूत केले. मुंबईतील ताडदेवच्या तुळशीवाडीतील नौशेर भरूचा या परशी नेत्याला विधानसभेला जळगावमधून उभे केले आणि ते विजयी झाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत जे वातावरण होते तेच वातावरण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हाेते. एक-एक सभा लाखा-लाखांची होत होती… आता जशा रात्री १० वाजता सभा संपवाव्या लागतात, तसे बंधन नव्हते. एका रात्रीत तीन-तीन सभा…. तासन-तास वाट बघत बसणारे श्रोते… त्यावेळची पद्धत कशी होती… समजा मुंबईत सभा आहे… तर अमरशेख यांच्या पाेवाड्याने सभा चालू व्हायची… आणि अत्रे, डांगे, एस. एम. आले की, अमरशेख पुढे पनवेलच्या सभेला जायचे. सभांचे नियोजनच असे केले होते की, सारा महाराष्ट्र घुसळून निघाला…
या शाहिरांच्या खिशात दमडीही नसायची… कोणतरी कार्यकर्ते… कोणाचीतरी गाडी आणून या सभेतून त्या सभेत, शाहीर मंडळींना घेवून जायचे… त्यांच्या राहण्याची व्यवस्था नाही…. कुठल्यातरी कार्यकर्त्याकडे भाजी-भाकरी खायची… ना गाडी… ना घोडे… एका ईर्षेने पेटलेले हे शाहीर हाेते. आज कोणाला खरे वाटणार नाही… अमर शेखच्या सभेचा बाज असा होता की, त्या काळात माईक नसलेल्या सभेत लाख माणसांपर्यंत पोहोचेल असा पहाडी आवाज… शाहीर अमरशेख यांचा तो आवेष…. तो सोगा… डोक्यावरती केसाची झुल्फ… हातात डफ… तो हवेत उंच फडकवलेला हात…
१) ‘जाग मराठा… आम जमाना बदलेगा…’
२) जनतेच्या सत्तेची ज्योत जागती…
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती…
भिन्न धर्म जातीची सर्व बंधने
तोडुनिया एक जीव जाहली मने
लोक युगासाठी जेथे रक्त सांडती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती…
अशी कितीतरी गिते आज सागता येतील. आज अमरशेख यांचा तो दणदणीत आवाज कानात घुमतो आहे… कोणाला खरे वाटणार नाही… तीन-तीन कंदिल लावून लाखा-लाखांच्या सभा आणि माईकशिवाय गर्जणारे अमर शेख आज असे डोळ्यांसमोर येत आहेत. त्याला साथ देणारे त्याचे सहकारी… त्यांना संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर काही मिळालेले नाही… त्यांना कोणी विचारलेही नाही. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्यावा, असे कुणाला वाटले नाही. एखादा शाहीर रक्त ओकला असता… महाराष्ट्रासाठी त्यांनी जीव ओतून हे जे काही काम केले त्याला तोड नाही. अमरशेख नुसतेच शाहीर नव्हते… ते कवीही होते… ‘कलश’ हा त्यांचा ४० कवितांचा संग्रह. त्याला आचार्य अत्रे यांची पन्नास पानांची प्रस्तावना… सात रस्ता येथील शिरीन टॉकीज जवळील एका चाळीतील एका खोलीत त्यांचा संसार… पत्नी हिंदू…. त्यांनी कधी जात पाहिली नाही… धर्म पाहिला नाही… महाराष्ट्र धर्माचाच जयजयकार केला म्हणूनच ते आपल्या कवितेत लिहू शकले….
‘या पर्वतराजी कसल्या….
करवतीच तापवलेल्या
महाराष्ट्राभोवती पसरल्या
अरीसेना ज्यांना चिरल्या….’
या कवितेतील ‘चिरल्या’ हा शब्द ज्या ठसक्यात अमरशेख उच्चारायचे, तो शब्द आजही कानात तापल्या तेलासारखा चिर-चिर केलेला जाणवतो.. असे हे अमरशेख एका भीषण अपघातात त्यांचा अंत व्हावा… महाराष्ट्राला त्यांचा विसरही पडला.
दुसरे आमचे आण्णाभाऊ साठे. केवढा महान कवी… महान लेखक… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमरशेख आणि आण्णाभाऊ गर्जत होते. आण्णाभाऊंची गावाकडे राहिलेली ‘मैना’ आणि त्यांच्या जीवाची काहिली… पण, ही कविता केवळ रोमान्सकरिता नव्हती…. त्याच्या पुढचे शब्द…. ही मुंबई कोणाची….श्रमणाऱ्या कामगाराची की… शेवरलेटवाल्या गाडीच्या मालकाची… आण्णाभाऊंचे ते तिखट शब्द भेदून जात होते आणि आमचा नारायण सुर्वे… त्याचं ते गीत…
डोंगरी शेत माझं…
मी बेणू किती…
सकाळी भोंगा झाला की, सारी मुंबई कामाला लागायची… संयुक्त महाराष्ट्राचा लढा या मुंबईत िगरणी कामगारांनी लढवला आणि ग्रामीण भागात उद्धवराव पाटील, क्रांतिवीर नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी लढवला. हुतात्मा स्मारक उभे राहिले… त्यात कामगारही आहे आणि शेतकरीही आहे. आज ६३ वा वाढदिवस समोर आला असताना मन अस्वस्थ होवून जाते. की, ज्या कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. तो कामगार आणि शेतकरीच ६३ वर्षांत चिरडला गेला आहे. मुंबईतील गिरणी कामगारही चिरडून टाकला.. त्याजागी मॉल आले. मंत्रालयाचाही मॉल झाला. पत्रकारांची दुकानं झाली. महाराष्ट्रासाठी लढलेला शेतकरी आणि कामगार यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आणि गिरणगावात ओसवालचे टॉवर उभे राहिले.
पवारसाहेबांच्या त्या भाषणामुळे आज ते सगळे शाहीर आठवले. ते आत्माराम पाटील आज समोर उभे राहून डफावर थाप मारून गात आहेत..
‘संयुक्त महराष्ट्र उगवतोय…
माझ्या सरकारा…
खुशाल कोंबडं झाकून धरा..’
बेल्लरी बेळगाव… पंढरी पारगाव…
बोरी उंबरगाव… राहुरी जळगाव
सिन्नर ठाणगाव… पंढरी नानगाव…
वऱ्हाडी वडगाव… भंडारा, चांदा
सातारा, सांगली…
जागृत केलेय दख्खनपुरा..
खुशाल कोंबड झाकून धरा…
या सगळ्या शाहीरांनी असा महाराष्ट्र घुसळून काढला होता. १५ नोव्हेंबर १९५६ चा फ्लोरा फाऊंटनचा महामोर्चा… २९ सप्टेंबर १९५६ ची द्विभाषिक विरोधी परिषद… लाख लोक उपस्थित होते त्याला. ३० नोव्हेंबर १९५७ चा प्रतापगडचा मोर्चा. १९ डिसेंबर १९५८ चा लोकसभेवर धडकलेला मोर्चा… या सगळ्या मोर्चाच्या अग्रभागी भाड्याने आणलेल्या एका लॉरीत अमरशेख, आण्णाभाऊ, आत्माराम पाटील, शाहीर गव्हाणकर आणि हे सगळे पथक तासन तास गात होते.
मोर्चा संपला… आचार्य अत्रे यांनी अमरशेख यांना मिठी मारली… आणि म्हणाले, ‘शाब्बास शाहीर… आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर हातातलं सोन्याचं कडं त्यांनी तुम्हाला बक्षीस दिले असते… आणि साधासुधा शाहीर असता तर रक्त ओकला असता… ’
संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यात शाहीरांचा वाटा फार मोठा आहे. पण, हे सगळे शाहीर उपेक्षित राहिले. १ अॅागस्ट २०२० रोजी आण्णाभाऊंची जन्म शताब्दी झाली. त्यावेळच्या महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना असताना माझंच आण्णाभाऊंवर अॅानलाईन भाषण ठेवले होते. मलिक्कार्जुन खरगेही त्यावेळी उपस्थित होते. सरकार ठाकरे यांचे होते. मी आग्रहाने सागितले की, अमरशेख, आण्णाभाऊ यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्- भूषण’ द्या. त्यावेळच्या मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे की, त्यांना ‘भारतरत्न’ द्या…. ’
मी ताड्कन म्हणालो, किती भाबड्या आहात तुम्ही… आणि तुमचं सरकार… केंद्र सरकार ‘आण्णाभाऊंना भारतरत्न देईल? तुमच्या हातात जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासारखा आहे, तो7 तरी देण्याची दानत दाखवा.
अमरशेख, आण्णाभाऊ आणि शाहीरसाबळेसुद्दा यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला काय हरकत आहे? आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तरच महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेबांच्या घरी जावून २००८ साली दिला, तर काही दिवसापूर्वी पाच पंचवीस लोकांचा जीव घेऊन नानासाहेब धर्माधिकारीसला राजकीय हेतूने राजकारण करून महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला ना… मग या तीन शाहीरांच्या कुटुंबियांना घरी जाऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या.
कोणाला काहीही पडलेल नाही. लढणारे लढले… मरणारे मेले… खंत एवढीच आहे… संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त ओकले कोण… डफ कडाडले कोणाचे? लढले कोण? हुतात्मा झाले कोण? आणि गब्बर झाले कोण?