बिहार- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या राजधानी दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत होते. संध्याकाळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर नितीश कुमार यांची निवडणुकीची योजना सध्या चर्चेत आहे. नितीश यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की, नितीश यांना २०२४ च्या निवडणुकीता मोठ्या विरोधी ऐक्याचे शिल्पकार व्हायचे आहे.
जे पक्ष काँग्रेस आणि भाजपापासून अंतर राखून आहेत त्यांना एकत्र आणण्याचं कामही नितीश कुमार करणार आहेत. म्हणूनच नितीश यांनी काल अरविंद केजरीवाल यांचीदेखील भेट घेतली. केजरीवाल हे भाजपावर सातत्याने हल्लाबोल करत असतात, परंतु ते काँग्रेसपासूनही अंतर राखून आहेत. काँग्रेसने उद्धव ठाकरे (शिवसेना), झारखंड मुक्ती मोर्चा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना सोबत घेण्याची जबाबदारी घेतली आहे. तर नितीश यांनी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव आणि डाव्या पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. जनता दल युनायटेडने याला नितीश फॉर्म्युला म्हटलं आहे.
नितीश यांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी त्यांच्यासोबत आहे. विरोधकांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणं अत्यंत गरजेचं आहे. नितीश कुमार यांच्या फॉर्म्युलानुसार विरोधी पक्षांची योजना आहे की, भाजपाच्या उमेदवाराविरोधात एकच उमेदवार उभा करावा. या योजनेची पुष्टी करताना जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, “२०२४ मध्ये नरेंद्र मोदींविरुद्ध विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एका जागेवर एकच उमेदवार उभा करणे.”
१९७७ आणि १९८९ मध्ये देखील या सूत्राच्या सहाय्याने विरोधी पक्षांनी विजय मिळवला होता. दोन्ही वेळा सत्तेतल्या काँग्रेस पक्षाला पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु दोन्ही वेळा दोन ते तीन वर्षात काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली होती. जनता दलमधील सूत्रांनी सांगितलं की, एका जागेवर एकच उमेदवार उभा करणे हीच योजना सध्या आपल्याकडे आहे.
विरोधकांचा चेहरा कोण असणार?
नितीश कुमार सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चेहऱ्याबद्दल उल्लेख टाळत आहेत. विरोधकांचा मुख्य चेहरा कोण असेल याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. नितीश कुमार यांनी काही बैठकांनंतरही पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याचा उल्लेख केला नाही. तसेच हाच प्रश्न केजरीवाल यांना विचारला तेव्हा नितीश कुमार यांनी हा प्रश्न थांबवला. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, विरोधी पक्षांचं पंतप्रधानपदाबाबत एकमत झालेलं नाही.