
मुंबई ,10 मे 2023- मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि तिचा मालक मनसुख हिरेनचा गूढ मृत्यू प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलिस अधिकारी सुनील मानेने माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टात दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. या अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जोरदार विरोध केला होता.
बराच काळ कारागृहात राहिल्यावर आपण केलेल्या चुकांचा आपल्याला पश्चाताप झाला आहे. म्हणूनच आपण यात माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे माजी पोलिस अधिकारी सुनील मानेने फेब्रुवारी महिन्यात कोर्टात केलेल्या अर्जात नमूद केले होते. आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारचे अनेक पुरस्कारही आपल्याला मिळाले. पण दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून काही चुका झाल्या. त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी बळी पडलेल्यांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये उलगडून सांगण्याचा निर्णय घेतल्याचे सुनील मानेने या पत्रात म्हटले होते. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होण्याची मागणीही केली होती.
मात्र मानेच्या या अर्जाला केंद्रीय तपासयंत्रणा (एनआयए) ने जोरदार विरोध केला होता. या प्रकरणात सुनील माने हा इतर आरोपींप्रमाणेच सहभागी असल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी भूमिका एनआयएने कोर्टात घेतली होती. या अर्जावरील सुनावणी प्रलंबित असतानाच मानेकडून अचानक हा अर्ज मागे घेण्यात आला आहे. तसेच या खटल्यात आपली बाजू आपण स्वत:च माडणार असल्याचे सांगून त्याबाबतची रितसर परवानगीही कोर्टाकडे मागितली आहे.