▶️“एकनाथ शिंदे बंडखोरी करण्याआधी मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर नाही गेलो, तर मला अटक होईल असं म्हणाले होते”, असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. या दाव्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असताना त्यावरून एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते असणाऱ्या नारायण राणेंनी आगपाखड केली आहे. तसेच, यावेळी त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवरही प्रत्युत्तर दिलं आहे.
▶️काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
“हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं”, असं आदित्य ठाकरेंनी ‘इंडिया टुडे एन्क्लेव्ह’ कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.
▶️नारायण राणे म्हणतात, “तो बालिश आहे”
दरम्यान, यासंदर्भात नारायण राणेंना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी आदित्य ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ७१ हजार लोकांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यानिमित्ताने बोलत असताना नारायण राणेंना माध्यम प्रतिनिधींनी आदित्य ठाकरेंच्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणार नसल्याचं सांगितलं.
▶️“शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा अशी ही युती”
“मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आहे आदित्य ठाकरे? त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का? एकनाथ शिंदे भाजपाबरोबर गेले नाही. ते शिवसेना पक्ष घेऊन आले आहेत. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजपा अशी ही युती आहे. अशा प्रश्नांची तुम्ही का दखल घेताय मला कळत नाही. मी त्यांच्या मुद्द्यावर उत्तर देणार नाही. काहीही बोलतात ते. म्हणे रडले होते. कोणत्या वर्षी रडले होते?”, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी सरकारवर केलेल्या टीकेवरही नारायण राणेंनी उत्तर दिलं. बेरोजगारांना नोकरीची पत्रं वाटण्याचं काम आमच्याकडे शाखाप्रमुख करतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, “एखादा रोजगार जर असेल कुणाकडे तर संजय राऊतांनाच द्यायला सांगा. त्यांच्याकडे आहे ना रोजगार, तर संजय राऊतांना द्या म्हणावं”.