▶️ मोहाली
▪️पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून मोहालीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
▪️प्रकाशसिंग बादल यांना सोमवारी रुग्णालयात ICU मध्ये ठेवण्यात आले होते. आठवड्याभरापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा झाल्यास त्यांना खासगी वॉर्डात पाठवले जाऊ शकते असं सांगण्यात आलं होतं.
▪️प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र होते. प्रकाशसिंग बादल यांनी १९४७ मध्ये राजकारणात पदार्पण केले. १९६७ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. १९६९ मध्ये प्रकाशसिंग बादल पुन्हा आमदार झाले. तर प्रकाशसिंग बादल हे १९७०-७१, १९७७-८०, १९९७-२००२ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्याचवेळी १९७२, १९८० आणि २००२ मध्ये विरोधी पक्षनेतेही होते. प्रकाशसिंग बादल हे खासदारदेखील राहिले आहेत. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणूनही काम केले होते. १ मार्च २००७ ते २०१७ पर्यंत त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.