▶️ सातारा ,26 एप्रिल
रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाला (आरआरपीएल) राजापुरात पुन्हा विरोध सुरू झाला आहे. या आंदोलनात अनेक शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. प्रकल्पासाठी मातीचे संशोधन व परीक्षण करण्याचे काम सुरू आहे. याच्या निषेधार्थ सुमारे सहा गावांतील लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पासाठी केंद्राला पत्र पाठवले आहे. त्यामुळे ते आता का विरोध करतात हा संशोधनाचा विषय आहे. ही त्यांची कुठली भूमिका आहे, मला कळत नाही. जनता याचा विचार नक्की करेल. लोकांवर अन्याय करुन हा प्रकल्प होणार नाही, स्थानिकांच्या समंतीने, त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बारसू येथील प्रकल्पामुळे प्रदुषण होणार नाही. हा प्रकल्प नाणार येथे होणार होता मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बारसू येथे करावा, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी केंद्राला लिहले होते. आता मुख्यमंत्री पद गेले म्हणून उद्धव ठाकरे विरोध करत आहेत. त्यांनी समृद्धी महामार्गाला देखील विरोध केला होता. हा त्यांचा दुट्टपीपणा आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे सुट्टीवर असल्याची चर्चा रंगली होती. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर दापोली रस्त्याचे उद्घाटन केले. आता साताऱ्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली ही बैठक देखील महत्वाची आहे. घरी अडीच वर्ष बसलेल्यांनी मात्र मी दोन-तीन दिवस इकडे गेलो, तिकडे गेलो अशी विनाकारण चर्चा सुरू केली आहे.