⏩रत्नागिरी (प्रतिनिधी):* रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी ( टिडीएफ ) प्रणित लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील लेखी पत्र संघटनेचे जिल्हा सचिव शौकत महाते यांनी नुकतेच लोकशाही आघाडीकडे सुपूर्द केले आहे. अखिल भारतीय उर्दू संघटनेच्या पाठिंबामुळे लोकशाही आघाडीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांची संख्या वाढली असून यामुळे लोकशाही आघाडीच्या विजयाची शक्यता अधिक गडद झाल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची निवडणूक रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी होत आहे.या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार असून शिक्षक लोकशाही आघाडी ( टिडीएफ ) प्रणित लोकशाही आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये मुख्याध्यापक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना , चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघ , शिक्षक सेना, प्रयोगशाळा कर्मचारी संघटना , ग्रंथपाल संघ याबरोबरच आता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचा समावेश झाला आहे. पतपेढीचे कामकाज पारदर्शक व्हावे व पतपेढीची प्रगती होत जावी याकरिता तसेच सभासदांचे हित जपणारा लोकशाही आघाडीचा जाहीरनामा पाहून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केल्याचे जिल्हा सचिव शौकत महाते यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष व राज्य संघटक समी मोमीन जिल्हाध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर उपाध्यक्ष इम्तियाज शेख उपस्थित होते.