⏩कराड- राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना पाठिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ या नाट्यादरम्यान अमोल कोल्हे यांना ही दुखापत झाली आहे. अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग कराडमध्ये पार पडत आहेत. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरत असताना घोडेस्वारी करताना घोड्याच्या पाय घसल्याने कोल्हे यांच्या पाठीच्या मणक्याला त्रास झाला. मात्र त्रास होत असताना देखील त्यांनी महानाट्य सुरु ठेवले. पेन किलर गोळी घेऊन महानाट्य प्रयोग त्यांनी पूर्ण केला. दरम्यान गंभीर दुखापत असताना कराड येथील संध्याकाळी प्रयोग होणार असल्याचे कोल्हेंनी जाहिर केले.
कराड येथील प्रयोग संपल्यानंतर तातडीचे पाठीच्या गंभीर दुखापतीवर उपचारासाठी अमोल कोल्हे यांनी पुण्यात दाखल व्हावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड (11 मे ते 16 मे) येथील प्रयोग ठरल्यावेळेप्रमाणे होणार असल्याचे कोल्हेंनी जाहीर केलं आहे. त्यासाठी वेळेत उपचार घ्यावे लागणार आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मात्र कराडमधील काही प्रयोग रद्द करावे लागणार आहे. ज्या प्रेक्षकांना पुढील प्रयोगाचे अॅडव्हान्स तिकीट काढले आहेत त्यांना आधी होणारा प्रयोग (1 मे रोजी होणारा प्रयोग) पाहता येणार आहे. तर ज्यांना आजचा प्रयोग पाहता येणार त्यांना त्यांचे तिकिटाचे पैसे परत केले जातील असंही अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं आहे.