☯️राज्यातील वाघांच्या संख्येत चार वर्षांत २५ टक्यांनी वाढ

Spread the love

3 मे/मुंबई: राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाली आहे.

राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशात गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २ हजार ९६७ वरून ३ हजार १६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याबद्दल शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हीटीसाठी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल तसेच रस्ते प्रकल्पांचे १९ प्रस्ताव सादर करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page