⏩20 एप्रिल/मुंबई-कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत २३ विविध इंडस्ट्रीज, प्लेसमेंट एजन्सीज व इंडस्ट्री असोसिएशन, टिपीए या विविध संस्थांच्या समवेत सामंजस्य करार केले असून या सामंजस्य करारांच्या माध्यमातून १२ हजार ८०० रोजगार उपलब्ध होणार आहेत. या सामंजस्य करारांच्या माध्यमातून कौशल्य विकास ते स्वयंरोजगार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल असे मत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. राज्य कौशल्य विद्यापीठ, सेंट्रल हॉल, येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाचे २३ संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. राज्य शासनदेखील राज्यात रोजगाराच्या अनेक योजना राबवत आहे. राज्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असून त्याठिकाणी उद्योजकांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणले जाते. या माध्यमातून उमेदवारांना नोकरीची संधी मिळते तर उद्योजकांना पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना त्वरित रोजगार मिळवून देण्यात येत आहेत, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.