⏩सुदानमध्ये सैन्य आणि निमलष्करी दलात हिंसाचार; आत्तापर्यंत ५१२ जण ठार

Spread the love

⏩हिंसाचारात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याची मोहीम वेगाने सुरू

▶️खार्तुम- सुदानमध्ये जनरल अब्देल फताह अल-बुऱ्हान यांच्या नेतृत्वातील सैन्य (एसएएफ) आणि जनरल मोहम्मद हमदान दगालो यांच्या नेतृत्वाखालील निमलष्करी दल (आरएसएफ) यांच्यातील शस्त्रविराम वाढवल्यानंतरही हिंसा सुरूच आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच राजधानी खार्तुम आणि ओमडरमान या शहरांमध्ये जोरदार स्फोटांचे आणि बंदुकांचे आवाज ऐकू आले. यादरम्यान, तिथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे, तर टर्कीच्या बचावपथकातील विमानावर शुक्रवारी हल्ला झाला, मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

सुदानमध्ये १५ एप्रिलला सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यान हिंसा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सामान्य नागरिक आणि सैनिक मिळून किमान ५१२ जण ठार झाले आहेत, तर किमान ४ हजार २०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये किमान ३०३ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती डॉक्टरांच्या संघटनेने दिली आहे. परदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी ७२ तासांचा शस्त्रविराम जाहीर करण्यात आला. त्यानंतरही दोन्ही बाजूंनी हिंसा सुरूच राहिली; पण त्याची तीव्रता काहीशी कमी झाल्यामुळे अनेक देशांना आपापल्या नागरिकांची सुटका करणे शक्य झाले. यानंतर हा शस्त्रविराम आणखी वाढवण्यात आला; पण शुक्रवारी त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. सैन्याच्या मुख्यालयाजवळ, अध्यक्षांच्या प्रासादाजवळ आणि खार्तुम आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटांचे, बंदुकांचे आणि तोफांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन कावेरीअंतर्गत सुदानमधून सुटका करण्यात आलेल्या १३५ भारतीयांची नववी तुकडी पोर्ट सुदान येथून जेद्दाहला दाखल झाली, तर आयएनएस तरकशमधून ३२६ भारतीयांची दहावी तुकडी पोर्ट सुदान येथून जेद्दाहला दाखल झाली, तर सुटका करण्यात आलेल्या अकराव्या तुकडीत १३५ भारतीयांचा समावेश आहे. त्याशिवाय सुटका करण्यात आलेल्या ३६२ भारतीयांचा एक गट जेद्दाहमधून बंगळूरुकडे निघाला आहे. त्यांच्याबरोबर व्ही. मुरलीधरन हे होते. या सुटका केलेल्यांमध्ये कर्नाटकातील हक्की पक्की जमातीतील नागरिकांची संख्याही मोठी असल्याचे त्यांनी सांगितले आहे, तर सुटका झालेल्या ३९२ भारतीयांचा दुसरा गट जेद्दाहमधून नवी दिल्लीकडे निघाला आहे. यापूर्वी भारतात पोहोचलेल्या नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page