एकीकडे राज्यावर उष्णतेच्या लाटेचं संकट असताना दुसरीकडे वीजेच्या मागणीतही रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीनं उच्चांक गाठला आहे. काल (18 एप्रिल) 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली आहे . एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार 678 मेगावॅटवर पोहचली आहे. महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी ही एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती. हा आकडा आता 25 हजार 100 मेगा वॅट वीज मागणीसह मागील आठवड्यात मागे पडला होता.
⏩ राज्यात आज गारपिटीची शक्यता
राज्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता आहे.
⏩ आज लखनऊ विरुध्द राजस्थान सामना
IPL मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुध्द राजस्थान रॉयल्स हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरुहोणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ 8 पॉईंट्ससह गुणतालिकेत प्रथम स्थानावर आहे. तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर 6 पॉईंट्ससह लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आहे.