▶️ वाँशिंग्टन- उष्णतेची लाट म्हणजे काय याचा अनुभव नुकताच आपल्याला आला. पृथ्वीवरच्या वातावरणाचे तापमान असेच वाढत गेले तर? भविष्यात अनेक संकटे संभवतात. पृथ्वीवरील वातावरणाची तापमानवाढ सरासरी दीड अंश से. राखण्यात यश मिळाले, तरीसुद्धा सन २१००पर्यंत पृथ्वीवरील निम्म्या हिमनद्या वितळतील आणि त्यातल्या निम्म्या तर येत्या ३० वर्षांतच नाहीशा होतील, असा6 इशारा हवामानविषयक संशोधकांनी दिला आहे.
वातावरणाचे तापमान सरासरी दीड अंश से.नंच वाढले, तरीसुद्धा पृथ्वीवरील ४९ टक्के हिमनद्या नाहीशा होतील. सध्या वातावरणाचे तापमान सरासरी २.७ अंश से.ने वाढलं आहे. ते तसेच कायम राहिले, तरीही एकंदर ६८ टक्के हिमनद्या नाहीशा होतीलच, पण पुढच्या शतकाच्या अखेरीस मध्य युरोप, पश्चिम कॅनडा आणि अमेरिका इथे हिमनद्यांचा मागमूसही राहणार नाही. परिणामी सागराची सरासरी पातळी ११५ मिमीने वाढेल. २०० कोटी लोकांना पुरेसे पाणी मिळणार नाही, अनेक ठिकाणी पूर येतील. या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी पृथ्वीवरील एकंदर दोन लाख हिमनद्यांचा अभ्यास केला असला, तरी ग्रीनलँड आणि दक्षिण ध्रुवावरील हिमाचा विचार केलेला नाही.
गेल्या दोन दशकांत उपग्रहांमुळे हिमनद्यांबाबतची माहिती अधिक अचूकतेने आपल्या हाती आली. यामुळेच वातावरण सरासरी किती अंशानी तापले, तर कोणत्या हिमनद्या किती वितळतील, याचा अंदाज बांधणे संशोधकांना शक्य झाले! या अभ्यासनिबंधाचे प्रमुख लेखक डॉ. डेव्हिड रौन्स म्हणतात, वातावरणातील बदलाबरोबर किती हिमनद्या नाहीशा होतील, याची मोजदाद पहिल्यांदाच करता आली. ज्या हिमनद्या नाहीशा होण्याचा धोका आहे, त्यातील बहुसंख्य हिमनद्या आकाराने एक चौरस किमीपेक्षाही कमी असतील. पण या छोट्या हिमनद्या लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहेत, ही वस्तुस्थिती आहे.