▶️नवीदिल्ली- देशामध्ये कोरोनामुळे पुन्हा भीती वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता कोरोनाने पुन्हा वेग धरला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ३५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,355 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 5,31,424 वर पोहचली आहे. सध्या देशामध्ये सक्रीय रुग्णांचा आकडा 57,410 वर पोहचला आहे. तर देशात आतापर्यंत 4,43,35,977 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये 9,629 रुग्ण आढळले होते. आज समोर आलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी ही कालच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत किंचित कमी आहे.
देशातील दैनिक पॉझिटिव्ह रेट 4.08 टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्ह रेट 5.36 टक्के नोंदविला गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोना लसीचे एकूण 220,66,54,444 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत 4 हजार 358 लोकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रात देखील कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 784 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये 185 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंत 81,63,625 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा आकडा 1,48,508 वर पोहचला आहे. राज्यातील कोविड डेट रेट 1.81 टक्के एवढा आहे.