
रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध आरेवारे समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. समुद्रात भिजण्यासाठी उतरलेले तिघेजण भरतीच्या लाटांमध्ये अडकून बुडण्याच्या स्थितीत गेले. मात्र किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या सतर्क आणि धाडसी स्थानिकांनी वेळेवर हस्तक्षेप करून तिघांचे प्राण वाचवले.
रविवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता ही घटना घडली. आरे समुद्रात भिजण्यासाठी गेलेल्या तीन पर्यटकांना भरतीच्या लाटांमुळे भोवऱ्याचा फटका बसला आणि ते खोल समुद्रात ओढले गेले. तिघेही मदतीसाठी आरडाओरड करू लागले. ही गंभीर परिस्थिती ओळखून किनाऱ्यावर उपस्थित असलेले श्रेयस पवार, अर्पित भोसले, सुरज चव्हाण, ओंकार सागवेकर, आदित्य पाटील, पोलिस पाटील आदेश कदम, श्लोक पाटील आणि सुयोग भाटकर यांनी धाव घेत धाडसाने पाण्यात उतरून तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.
ही घटना आरेवारे परिसरातील वाढत्या पर्यटकांच्या असावध वर्तनाचे उदाहरण असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना पायदळी तुडवल्या जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. समुद्रकिनारी धोकादायक ठिकाणी पोहण्यास मनाई असूनही अनेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत.
स्थानिकांचे प्रसंगावधान आणि धाडसामुळे तिघांचे प्राण वाचले असले तरी भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.