‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’:​​​​​​​देवेंद्र फडणवीस यांनी मानले भाजपचे आभार; महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचा निर्धार…

Spread the love

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपली निवड केल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धारही व्यक्त केला. विशेषतः यावेळी त्यांनी यंदाची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरल्याचे नमूद करत ‘एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकीन है’चा नाराही दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ही निवड प्रक्रिया करण्यासाठी आलेले केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामन यांचेही मी आभार मानतो. विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेत आमच्यासोबत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी आभार मानतो. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की, यावेळची निवडणूक अत्यंत ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर, तर मी असे म्हणेन की, या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यापुढे निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है.

मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका सुरू…

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात विजयाची मालिका सुरू झाली. महाराष्ट्राच्या जनतेला माझा साष्टांग दंडवत. त्यांनी खूप मोठा जनादेश आम्हाला दिला. यंदाचे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, त्या संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या वर्षात आज आपण सरकार स्थापन करत आहोत.

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. आम्हाला प्रचंड मोठा जनादेश दिला. या जनादेशाचा आनंद आहेच, पण यामुळे आपली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने आम्हाला दिला आहे. विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, शेतकरी किंवा तरुण असतील या सर्वांनी आणि समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.

म्हणून आपली प्राथमिकता ही आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याला असेल. तसेच महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपल्या सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचे आहे.

2019 मध्ये आम्हाला मिळालेला कौल हिसकावून घेण्यात आला…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्येही जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. पण दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्यावेळी जनतेसोबत बेईमानी झाली. माझी त्या इतिहासात जाण्याची इच्छा नाही. आपण एक नवी सुरूवात करत आहोत. पण एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन, की सुरुवातीच्या अडीच वर्षात ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला. त्यानंतरही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सर्व आमदार, सर्व नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळेच 2022 मध्ये पुन्हा आपले सरकार आले. त्यातूनच आज पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने महायुतीचे सरकार आले. हे एक अभूतपूर्व यश आहे.

माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या सर्वोच्च पदाची 3 वेळा संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला, त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली. काम करण्याची संधी मिळाली.

काही गोष्टी मनासारख्या काही गोष्टी मनाविरोधात होतील…

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या सहकाऱ्यांना भविष्यातील काही गोष्टींचीही जाणिव करून दिली. ते म्हणाले, आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लाणार आहे. आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे करताना आपल्याला महायुतीमधील सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. काहीवेळा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पण आपण एक मोठा विचार घेऊन राजकारणात आलो आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

भविष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील व काही गोष्टी मनाविरोधात होतील. पण त्यानंतरही आपण सर्वजण एकदिलाने काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ. मी राज्यातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, आमचे सराकर महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासासाठी, प्रगतीसाठी 24 तास काम करेल व सामान्य माणसांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page